■ मुंबई l झुंजार सेनापती
राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. या प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा त्यांनी मंत्रालयातून घेतला.
बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधन, त्यांची निगा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुधनातून मिळणाऱ्या आर्थिक संधींची माहिती देण्यासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. जैविक शेती, पशुधनावर आधारित उद्योग आणि पूरक व्यवसायांबाबत चर्चासत्रे आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रदर्शनात सुमारे १५०० पशू प्रदर्शित करण्यात येणार असून विविध जातींच्या पशुधनासह डॉग शो आणि प्राण्यांच्या सुमारे ४० स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असून परराज्यातील दर्जेदार पशुपक्ष्यांचाही सहभाग राहणार आहे. कृषी, महिला व बालविकास विभागांसह विविध शासकीय योजनांचे माहितीपर स्टॉल तसेच बचतगटांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
प्रदर्शनाला मोठी गर्दी अपेक्षित असल्याने स्वच्छता, सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. महिलांसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, रुग्णावाहिका, अग्निशमन व्यवस्था, पोलिस संरक्षण आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. प्रदर्शनस्थळी रक्तदान शिबिर आणि अवयवदान जनजागृती उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. देवरे यांनी सांगितले की, प्रदर्शनासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पशुधन वाहतुकीसाठी वेगळी सोय आणि मुख्य सभास्थानी २० हजार आसनक्षमता असणार आहे. तीन स्वतंत्र पॅव्हेलियनमध्ये सुमारे ३०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पशुपालकांसोबत या क्षेत्रातील उद्योजकांचाही सहभाग राहणार आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात २० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली आहे. स्वयंसेवक म्हणून एनसीसी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पोलिस हेल्पडेस्क उभारण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.



