spot_img
27.8 C
New York
Thursday, July 17, 2025

Buy now

spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

झुंजार सेनापती l मुंबई  

महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे, ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना काढले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भौगोलिक परिस्थ‍ितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी, गनिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर, वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे, लष्करी रणनिती, ग‌निमी कावा याला पूरक ठरणारी डोंगरी किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले. मात्र शिवाजी महारा‌जांनी याचा वापर लोक कल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला. हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला आहे.

वारसा यादीत किल्ल्यांचा समावेश झाल्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार आहे.  त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातून ७ प्रस्ताव युनोस्कोमध्ये नामांकन होण्याकरिता गेले होते. त्यापैकी पंतप्रधानांनी निर्णय घेऊन छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा म्हणून नामांकन करायचे ठरविले. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले. 

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या पुरातत्त्व वास्तूसंग्रालयाचे, संचालनालयाचे संचालक  यांनी हा प्रस्ताव तयार केला. संपूर्ण भारतातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास ८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या २ प्रस्तावांचा समावेश होता. त्यातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीने निवड करण्यात आली. या नामांकनाच्या कार्यवाहीचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी द. कोरिया येथील श्री. कोगली यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू राज्यातील किल्ल्यांना भेट दिली. यासंबंधी नवी दिल्ली येथे जुलै २०२४ मध्ये झालेल्या यूनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ व्या अधिवेशनातील चर्चासत्रात महाराष्ट्रातील तज्ञांनी भाग घेतला. युनेस्को मुख्यालय, पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले.   सर्व सदस्य देशांमध्ये मतदानाद्वारे यावर सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या. विदेश मंत्रालय, युनेस्को, भारताचे राजदूत आणि अनेक दे‌शांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्याचे महत्त्वही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विषद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतराराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली आहे. जवळपास सगळ्या कमिटीपैकी, मतदानाचा अधिकार २० देशांना होता. या २० ही देशांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे, असे मतदान केले. त्यामुळे एकमताने, याठिकाणी हा प्रस्ताव मंजूर झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक क्षणाबद्दल सभागृ‌हामार्फत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहलय व संचलनालय आणि या कार्यातील योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे, महाराष्ट्रातील जनतेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार

झुंजार सेनापती l मुंबई पारपत्र अर्जासंदर्भातील पोलीस पडताळणी अत्यंत अचूक आणि नियमबद्ध असणे आवश्यक आहे. पारपत्रासाठी अर्ज करताना अर्जदाराला कायमस्वरूपी आणि सध्याचा पत्ता देण्याचे पर्याय...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

झुंजार सेनापती l पुणे  यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!