spot_img

ऊसतोड कामगारांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडे यांची भाऊबीज; चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजन

ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा दिला शब्द

⬤ झुंजार सेनापती l पुणे

ऊन-पावसाची तमा न बाळगता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामात अहोरात्र कष्ट करणाऱ्या कामगारांशी आपुलकीचे नाते जपत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, पालावर चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.


राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात गाव सोडून आलेल्या ऊसतोड कामगारांसोबत सण साजरा करण्याचा हा उपक्रम कामगारांसाठी आनंदाचा ठरला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तर भाऊबीजेच्या निमित्ताने कामगार महिलांनीही त्यांना साडीचोळीची ओवाळणी देत आपुलकी व्यक्त केली.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दरवर्षी आपण कष्टकरी कामगारांसोबत दिवाळी साजरी करतो. काही दिवसांपूर्वी अवघ्या २२ वर्षांच्या ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समजल्यानंतर मन सुन्न झाले. ऊसतोड कामगारांचे जीवन अनेक अडचणींनी व्यापलेले असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
ऊसतोड कामगारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. कामगारांनी आपल्या अडीअडचणी आणि समस्या कोणताही संकोच न बाळगता मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कामगारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष, संचालक, शेतकी अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यांनीही कष्टकरी कामगारांच्या पाठीशी पंकजा मुंडे नेहमीच उभ्या राहत असल्याचे सांगितले. ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी केल्याने खऱ्या अर्थाने सणाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालावर स्वागताची जय्यत तयारी
मंत्री पंकजा मुंडे पालावर येणार असल्याचे समजताच ऊसतोड कामगारांनी त्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त तयारी केली होती. पालासमोर सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक लोकगीते, चिमुकल्यांचे नवीन कपडे, भोजनाची तयारी आणि परिसराची स्वच्छता अशा विविध माध्यमांतून कामगारांनी स्वागताचे नियोजन केले होते. या उत्स्फूर्त स्वागतामुळे पालावर दिवाळीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कामगारांनीही मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. त्या आपल्या पालावर येणार असल्याचे समजल्यापासून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते, अशी भावना माणेवाडी येथील कुंडलिक बडे यांनी व्यक्त केली. तर पंकजा ताईंनी पालावर येऊन भाऊबीज साजरी केली, फराळ केला आणि महिलांना साडीचोळी भेट दिली, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे आष्टी येथील नवनाथ भोसले यांनी सांगितले.

Related Articles

कामगारांसोबत सण साजरा करणे हीच खऱ्या आपुलकीची भावना

⬤ झुंजार सेनापती l पुणे  ऊसतोड कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे या नेहमीच कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या...

कोकणातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा आंतरराष्ट्रीय बहुमान!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे. राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!