⬤ झुंजार सेनापती l पुणे
ऊसतोड कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे या नेहमीच कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.मुळशी तालुक्यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरात ऊसतोड कामगारांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन कामगारांसोबत भाऊबीज साजरी केली. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी आपली भावना व्यक्त केली.
सण-उत्सवांच्या काळात कुटुंबापासून दूर राहून ऊसतोड कामगारांना उदरनिर्वाहासाठी कष्ट करावे लागतात. अशा परिस्थितीत मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली, त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनात सहभागी होणे, ही केवळ औपचारिक भेट नसून कष्टकऱ्यांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक असल्याचे शेळके यांनी नमूद केले.
ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी केल्याने खऱ्या अर्थाने सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. अशा उपक्रमांमुळे कष्टकरी बांधवांना आपुलकीचा आधार मिळतो आणि त्यांच्यातही आनंदाचे वातावरण निर्माण होते, अशी भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली.


