spot_img
spot_img

वकिलांसाठी देशातील पहिली प्रशिक्षण अकॅडमी

नवी मुंबईत ‘आंबेडकर अ‍ॅडव्होकेट सेंटर’चे लोकार्पण

झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (बीबीएटीआरसी) या अकॅडमीचे नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहे, मग वकिलांसाठी का नसावी, याचे उत्तर बार कौन्सिलने या उपक्रमातून दिले आहे. राज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा उत्कृष्ट वापर करून अल्पावधीत ही दर्जेदार वास्तू उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या जलद आणि गुणवत्तापूर्ण बांधकामातून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आठवण होत असल्याचे नमूद करत त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बदलते कायदे, नवीन फौजदारी कायदे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अकॅडमीसाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
तंत्रज्ञानातील वेगवान बदलांशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून, एआयच्या वापरातील संभाव्य धोक्यांविषयीही जागरूक राहणे गरजेचे आहे. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाही; त्यामुळे हे रिसर्च सेंटर भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वकील तथा बीसीएमजीचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विधी महर्षी पुरस्कार’ न्यायमूर्ती बी.बी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. अमरावतीचे दिवाणी वकील ज्ञानेश्वर बावरेकर यांचा मरणोत्तर पुरस्कार त्यांचे पुत्र अ‍ॅड. संजय बावरेकर यांनी स्वीकारला.
या सोहळ्यास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (बीसीएमजी) चे उपाध्यक्ष अ‍ॅड. जयंत डी. जायभावे, बीबीएटीआरसीचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. उदय पी. वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड. आशिष पी. देशमुख, समन्वयक व उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम डी. देसाई तसेच बार कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Οδηγός για την πρώτη σας εγγραφή στο bizzo casino online

Αυτός ο οδηγός έχει σχεδιαστεί για να σας καθοδηγήσει στη διαδικασία της πρώτης σας εγγραφής στο bizzo casino online. Θα καλύψουμε όλα τα βήματα...

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा वाचवण्यासाठी छत्रपती घराण्याने पुढाकार घ्यावा!

झुंजार सेनापती l मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानासाठी वंदनीय आणि प्रेरणास्थान आहेत. मात्र त्यांच्या पुतळ्यांच्या आडून काही समाजकंठक आणि राजकीय स्वार्थी घटक आपले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!