झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून सूट दिली आहे. परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने अडचणीत सापडलेल्या शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्याने निवडणूक कर्तव्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित राहता येणार नव्हते. याबाबत शिक्षकांकडून आलेल्या निवेदनांची दखल घेत आयोगाने तातडीने निर्णय घेत संबंधितांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचे आदेश दिले.
परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांनी प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून सूट घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत



