spot_img
spot_img
spot_img

रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’चे आयोजन

झुंजार सेनापती l मुंबई

देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या 57 वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत 14 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा आरंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती

या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत 50 टक्के महिला सहभागी आहेत.

या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदर सुरक्षेतील ‘सीआयएसएफ’च्या 51 वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे हा उद्देश आहे.

1969 मध्ये स्थापन झालेल्या ‘सीआयएसएफ’ने गेल्या 57 वर्षांत रिफायनरीज, विमानतळ, बंदरे, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्रे यांसह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जोपासत आहे.

6,600 किलोमीटरचा प्रवास

‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन–2025 ला 30 लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तर 2.9 कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते.

52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक

            सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असून, त्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

Related Articles

मुंबई-पुणे महामार्गावर आपत्ती टँकर उलटला; प्रशासन हतबल

झुंजार सेनापती l मुंबई पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली....

म्हाडा मुख्यालयात उंदरांचे साम्राज्य; कर्मचारी त्रस्त

झुंजार सेनापती l मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या गृहनिर्माण भवन मुख्यालयात उंदरांचा प्रचंड उच्छाद वाढला असून कर्मचारी हैराण झाले आहेत. इमारतीतील महत्त्वाच्या फाइल्स...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!