झुंजार सेनापती l प्रतिनिधी l वडगाव मावळ
पुणे महानगर प्रदेशातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि पर्यटनाचा वेग लक्षात घेता मावळ तालुक्यासाठी मेट्रो प्रकल्पाची गरज अधोरेखित होत आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मावळसाठी मेट्रो प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. निगडी ते मावळ आणि हिंजवडी या पट्ट्यात वाढत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रो हा प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः हिंजवडी आयटी पार्क तसेच तळेगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारी कामगारांची ये-जा, उद्योगांचा वाढता विस्तार आणि दररोजची वाहतूक यामुळे प्रवास अधिकच कठीण बनला आहे. मेट्रो प्रकल्प उभारल्यास प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, तसेच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रस्तावित प्रकल्पामुळे मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, तसेच भविष्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



