spot_img

आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नाविन्यतेवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित दिवंगत दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॅा. पंकज भोयर, शालीनीताई मेघे, आमदार समीर मेघे, सागर मेघे यांच्यासह मेघे कुटुंबीय, शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला. त्यामुळे हवामानाचा ताण सहन करणारी आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन आणि त्याच्या उपयोजनाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. शेतीसोबतच पशुपालन हा शेतक-यांसाठी महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्वाचे आहे. देशी गाई केवळ दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेले हे दोन्ही शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. रामटेकच्या विकासासाठी या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आमदार समीर मेघे यांनी आभार मानले.

 

 

Related Articles

जगाला विकासाचा नवा मार्ग दाखविण्याची भारतावर जबाबदारी

⬤ झुंजार सेनापती l नागपूर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विकासाच्या संकल्पनेला व्यापक दृष्टिकोन देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गासह आपण सर्वजण एकाच...

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये ‘भागीदार राज्य म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!