spot_img
spot_img
spot_img

चीनच्या घुसखोरीवरून लोकसभेत गदारोळ; काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

झुंजार सेनापती l नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) 

चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी तीव्र गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून पुन्हा रोखण्यात आल्याने विरोधक संतप्त झाले आणि सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. या गोंधळादरम्यान काही खासदारांनी सभापतींच्या दिशेने कागदाच्या चिटोऱ्या भिरकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या एकूण आठ खासदारांना निलंबित करण्यात आले.
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी बोलू इच्छित होते. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी अडथळे आणल्याने त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त करत सभागृहाच्या मध्यभागी येत आंदोलन सुरू केले.
गदारोळ वाढत गेल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रथम कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब केले. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. सभापतींवर कागद फेकल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे मणिक्कम टागोर, हिबी ईडन, अमरिंदरसिंग वारिंग, गुरजित सिंग औजला, किरणकुमार रेड्डी, प्रशांत पडोळे, डीन कुरियाकोस तसेच माकपाचे एस. वेंकटेश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, निलंबित खासदारांसह राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्टाच्या मकर द्वारावर निदर्शने केली. यावेळी त्यांनी चीनच्या घुसखोरीबरोबरच भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सत्ताधारी पक्षाकडून मात्र सभागृहातील शिस्त भंग करणाऱ्या सदस्यांवर कारवाई अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले. संसदीय परंपरांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. चीनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले, मात्र गोंधळाच्या वातावरणात कामकाज होऊ शकत नसल्याचेही नमूद करण्यात आले.
चीनच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर संसदेत सुरू असलेला हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, पुढील अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई  बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश...

टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!