⬤ झुंजार सेनापती l मुंबई
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये संवादाला अत्यंत महत्त्व असून संवादातूनच अनेक प्रश्नांवर मार्ग निघू शकतो, यावर आपला ठाम विश्वास आहे. विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असून, आगामी पावसाळी अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याची शासनाची भूमिका असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सरकार सकारात्मक भूमिका मांडणार आहे.
राज्याच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर विधायक चर्चा व्हावी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चहापान कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.



