⬤ झुंजार सेनापती l मुंबई
ससून गोदी ही केवळ मच्छीमारीची गोदी नसून मुंबईची ओळख आणि येथील मच्छीमार कुटुंबांच्या भविष्याचा आधार आहे. या गोदीचे संरक्षण करून येथे काम करणाऱ्या मच्छीमारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ससून गोदीच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देतानाच महिला मच्छीमारांच्या मुलांसाठी पाळणाघर, कामगारांसाठी उपाहारगृह आणि गोदामांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या वतीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदी येथील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात ते बोलत होते.
ससून गोदी ही मुंबईची ओळख

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, गेटवे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याप्रमाणेच ससून गोदीचाही मुंबईच्या प्रमुख ओळखींमध्ये समावेश होतो. या गोदीशी मुंबईतील अनेक नागरिकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. येथील मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या गोदीचा विकास आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, मच्छीमारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेतात, असेही त्यांनी नमूद केले.
महिला मच्छीमारांच्या अडचणी सोडविण्यावर भर
ससून गोदी येथे महिला मच्छीमार पहाटेपासून कामाला सुरुवात करतात. अनेक महिलांना लहान मुलांना सांभाळण्यासाठी पर्याय नसल्याने मुलांनाही सोबत आणावे लागते. त्यामुळे या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करणे आवश्यक आहे. तसेच, महिला व पुरुष कामगारांसाठी विश्रांतीची सुविधा, उपाहारगृह आणि कॅफेटेरिया उपलब्ध करून द्यावा. गोदी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेच्या सुविधांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या सुविधांमुळे महिला मच्छीमारांसह सर्व कामगारांना मोठा दिलासा मिळेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
ससून गोदीच्या आधुनिकीकरणाची कामे सुरू
ससून गोदीच्या आधुनिकीकरणांतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बर्फ भरण्याच्या प्रक्रियेचे स्वयंचलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन लिलावगृह तसेच कामगारांसाठी विश्रांतीच्या सुविधा विकसित करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय, गोदीतील गोदामांबाबतचा प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोदीतील पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास मच्छीमारांचा व्यवसाय अधिक सुलभ होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.



