⬤ झुंजार सेनापती l मुंबई
टोरंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत येथील सभेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जंगलातील तोडलेल्या झाडांची रचून ठेवलेली लाकडे पाहून ‘जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं,’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सह्याद्रीच्या कुशीत अशा प्रकारचे २३ प्रकल्प येत असल्याचा दावा करत त्यांनी पर्यावरण, स्थानिकांचे विस्थापन आणि प्रकल्पांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘आज सकाळी जंगलात जाऊन पाहणी केली. तेथे तोडलेल्या झाडांची लाकडे रचून ठेवली होती. जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं. जंगल वाचवण्याची विनंती करण्यासाठी महिला हात जोडत आहेत. त्यांच्यावर अशी वेळ का यावी?’’
‘महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून ठरतात’
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना ठाकरे यांनी मोठ्या प्रकल्पांबाबतचे निर्णय केंद्र सरकार आणि खासगी कंपन्यांकडून ठरवले जात असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचाही त्यांनी संदर्भ दिला. महाराष्ट्राला कोणता प्रकल्प हवा, त्याचे स्वरूप काय असावे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘‘मी उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे; मात्र महाराष्ट्राला काय हवे, हे महाराष्ट्रातील माणसांनी ठरवले पाहिजे. दुसऱ्यांनी निर्णय घेऊन चालणार नाही,’’ असे ठाकरे म्हणाले.
सह्याद्रीतील २३ प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह
सह्याद्रीच्या परिसरात अशाच प्रकारचे २३ प्रकल्प प्रस्तावित असल्याचा दावा करत ठाकरे यांनी या प्रकल्पांसाठी पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. प्रकल्पांमुळे स्थानिकांना स्थलांतर करावे लागू शकते, तसेच लोकसंख्येच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भीमाशंकर परिसरातील प्रकल्पाचाही उल्लेख करत त्यांनी निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले.
टोरंट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वीजेचे वितरण कसे होणार, ते कुठे होणार आणि कोणामार्फत होणार, याची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. महावितरणच्या प्रस्तावित समभाग विक्रीचाही उल्लेख करत भविष्यात वीजदर ठरवण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
‘शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अन्यायाविरोधात पेटून उठा’
जंगलतोडीचा परिणाम केवळ झाडांपुरता मर्यादित नसून पक्षी आणि संपूर्ण पर्यावरणावर होत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. गडचिरोलीतील जंगलतोड आणि खाण प्रकल्पांचा संदर्भ देत त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखला देत वृक्षसंवर्धनाची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
निवडणुकीच्या वेळी जाती-धर्माच्या मुद्द्यांपेक्षा अशा प्रश्नांचा विचार करण्याचे आवाहन करत त्यांनी नागरिकांच्या सहभागावर भर दिला. ‘‘तुम्ही शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व करायचं नाही. मी तुमच्यासोबत आहे; पण या लढ्याचं नेतृत्व तुम्हालाच करायचं आहे,’’ असे ते म्हणाले.
सर्बियातील तरुणांच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी तरुणांनी सामाजिक प्रश्नांवर जागृत होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील जंगल, पर्यावरण आणि स्थानिकांचे हित जपण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंटरनेट बंदीवरूनही सरकारला टोला
मनसेच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचा दावा करत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. इंटरनेट बंद केल्याने माहितीचा प्रसार थांबणार नाही, असे सांगत त्यांनी भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होईल, असे म्हटले.
महाराष्ट्रातील जनतेने पर्यावरणविषयक प्रश्नांवर जागरूक राहावे, अन्यायाविरोधात आवाज उठवावा आणि राज्याच्या भवितव्याशी संबंधित निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.



