⬤ झुंजार सेनापती l बीड : गावात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला कामाला लावणाऱ्या गवारी येथील अनिल लोमटे (वय ३५) याच्याविरुद्ध नेकनूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २१७ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली आहे.
७ नोव्हेंबर रोजी अनिल शहादेव लोमटे याने डायल ११२ वर फोन करून गवारी गावात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या माहितीने पोलीस प्रशासन सतर्क झाले. नेकनूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी माहितीची पडताळणी केली; मात्र बॉम्ब ठेवल्याची माहिती पूर्णतः खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
आपत्कालीन यंत्रणेची दिशाभूल करून पोलिसांचा वेळ व मनुष्यबळ वाया घालविणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात अगुरक्र. ८००/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायल ११२ ही संकटसमयी नागरिकांच्या मदतीसाठी असलेली महत्त्वपूर्ण सेवा आहे. अशा सेवेवर खोटी माहिती दिल्याने खऱ्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे डायल ११२ चा गैरवापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांनी दिला आहे.


