spot_img
spot_img
spot_img

‘डिजिटल अरेस्ट’ ला घाबरू नका ; १९३० वर त्वरित तक्रार करा

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. २४ : ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना नसून हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे. अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
राज्यात विशेषतः मुंबई आणि अहिल्यानगर येथे वाढलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांबाबत आमदार अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही फसवे लोक स्वतःला पोलीस किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना फोन करतात. त्यांच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचे खोटे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची भीती दाखवली जाते. स्क्रीनसमोरून हलू नये, असे बजावून नंतर मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते. या जाळ्यात सामान्य नागरिकांसह उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीही अडकले आहेत.
या फसवणुकीचे सूत्रधार परदेशातून कार्यरत असून भारतातील काही लोक ‘हँडलर’ म्हणून काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी व्यापक यंत्रणा उभारण्यात आली आहे. चुकीने पैसे ट्रान्सफर झाल्यास त्वरित १९३० वर माहिती दिल्यास बँकांच्या समन्वयातून ती रक्कम गोठविण्याची शक्यता वाढते, असेही त्यांनी सांगितले.
राज्य व केंद्र सरकारकडून जनजागृती मोहीम राबवली जात असून टीव्ही जाहिराती, कॉलर ट्यून आणि विविध माध्यमांतून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. तरीही काही नागरिक या जाळ्यात अडकत असल्याने अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Related Articles

२४ महिन्यांत संपादन नसेल तर आरक्षण आपोआप बाद; उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश

■ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : सार्वजनिक प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेबाबत बॉम्बे उच्च न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण निवाडा दिला आहे....

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

■ झुंजार सेनापती l बीड  मांजरसुबा, दि. २४ (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे यंदाही संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!