झुंजार सेनापती l मुंबई
गृहराज्यमंत्री योगेश क सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याविरोधात राज्य सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ची ठाम भूमिका घेतली आहे. अमली पदार्थ प्रकरणांत पोलिसांचा सहभाग आढळल्यास कोणतीही दयामाया न दाखवता कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिला.
आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सहभागी आढळलेल्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून १० जणांना निलंबित करण्यात आले आहे. अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदस्य रोहित पाटील यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले की, सांगली जिल्ह्यात अलीकडेच पोलिसांनी मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला. गुजरातमधून आणलेल्या कच्च्या मालावर आधारित औद्योगिक वसाहतीत अमली पदार्थ तयार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सुमोटो कारवाई करत संपूर्ण साखळी उद्ध्वस्त केली. यात कच्चा माल पुरवठादार, उत्पादक, विक्रेते आणि पेडलर्स यांच्यासह सर्व स्तरांवरील आरोपींना अटक करण्यात आली.
राज्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा केवळ ड्रगविरोधी कारवाईवर लक्ष केंद्रित करणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन व बढतीसाठी विशेष तरतूद करण्याचा विचार सुरू आहे.
एनडीपीएस कायद्याअंतर्गत कठोर कारवाई सुरू असून मोठ्या प्रमाणातील गुन्ह्यांमध्ये अधिक कडक तरतुदींचा वापर केला जात आहे. मागील दीड वर्षांत राज्यात अमली पदार्थांशी संबंधित सुमारे १७,५०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून ही संख्या लक्षणीय वाढ दर्शवते.
सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः दौरा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच शाळा, महाविद्यालये आणि तरुणांमध्ये जनजागृती मोहीम राबवून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता वाढविण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अँटी ड्रग टास्क फोर्स कार्यरत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा आढावा घेतला जात आहे. “अमली पदार्थमुक्त सांगली” हा उद्देश ठेवून प्रशासन सर्वतोपरी पावले उचलणार, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.



