⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्य शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणी, कागदपत्रांची छाननी, मंजुरी आणि लाभ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
या सुविधेमुळे विशेषतः अंगणवाडी केंद्र कार्यरत नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही भागातील पात्र रहिवाशांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जाची सद्यस्थितीही पोर्टलवर पाहता येणार आहे.
शासकीय प्रक्रियांच्या पुनर्रचनेअंतर्गत योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. अर्जदारांना कार्यालयीन फेऱ्या आणि प्रक्रियात्मक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत राज्यातील २ लाख ९८ हजार ६९५ लाभार्थ्यांना योजनेचा पहिला लाभ मिळाला आहे.
ऑनलाइन अर्ज सुविधेमुळे पात्र मुलींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे



