spot_img

बीडीडी चाळ पुनर्विकासात गुणवत्तेशी तडजोड नाही; प्रकल्प वेळेत पूर्ण करा!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वेळेत आणि पूर्ण गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. पुनर्वसनाच्या सदनिकांच्या दर्जात अथवा नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या सदनिका विक्रीसाठी उभारण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या घरांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आणि सुविधांनी परिपूर्ण असाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवाशांना केवळ घर नव्हे, तर सर्वांगीण सुविधायुक्त परिसर उपलब्ध होतो. अशा पुनर्विकासातून मोकळ्या जागा, उद्याने, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याची जागा तसेच अन्य आवश्यक अशा एकूण २३ प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य शासन कार्यवाही करेल. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या विकासधोरणाचा केंद्रबिंदू असून, म्हाडा आणि अन्य शासकीय यंत्रणांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, असे त्यांनी सांगितले.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आवश्यक बदल करून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. पूर्वी अनेक पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते. अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने सक्रिय भूमिका घेतली असून, नागरिकांना घरांसह प्रलंबित भाडे मिळावे, यासाठीही कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील नागरिकांना मोकळ्या जागा आणि दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेसकोर्सची १२५ एकर जागा आणि कोस्टल रोडलगतची सुमारे १५० एकर जागा मिळून जवळपास ३०० एकरांवर जागतिक दर्जाचे खुले उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि मोकळ्या जागा यांचा समतोल साधून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनीही आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.


 

Related Articles

एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती २०२७ पर्यंत लांबणीवर!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ...

दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!