spot_img

बीडच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाला स्व.सुदामकाका भोंडवे यांचे नाव!

४० वर्षांच्या शिक्षणसेवेचा शासनदरबारी गौरव

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

बीड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला आता शिक्षणसमर्पित व्यक्तिमत्त्व स्व. सुदामकाका भोंडवे यांचे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील शासनादेश ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, विद्यालयाचे नामकरण आता ‘सुदाम काका भोंडवे शासकीय तांत्रिक विद्यालय, बीड’ असे करण्यात आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा शासनस्तरावर गौरव करणारा हा निर्णय मानला जात आहे.

भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या विचारांतून आणि प्रेरणेतून स्व. सुदामकाका भोंडवे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली होती. ऊसतोड कामगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देणे, हेच त्यांनी आपल्या जीवनकार्याचे ध्येय बनविले होते. गेल्या चार दशकांत सोनदरा गुरुकुलातून शिक्षण घेतलेले मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मराठवाड्यात सुमारे नऊ ते दहा शैक्षणिक प्रकल्पही उभे केले आहेत. त्यामुळे सुदामकाकांनी सुरू केलेली शिक्षणसेवा अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली आहे.
२१ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात सुदामकाका भोंडवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे निधन झाले होते. या घटनेने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या सोनदरा गुरुकुलाच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक कार्य आजही अविरत सुरू आहे.
या नामकरणाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल सोनदरा गुरुकुल परिवाराच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
नामांतर नव्हे, शिक्षणसेवेचा गौरव!
ऊसतोड कामगारांच्या आणि शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव शासकीय शिक्षणसंस्थेला देण्यात आल्याने बीड आणि मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्व. सुदामकाका भोंडवे यांचे नाव आता शासकीय विद्यालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री लोहारी सावंग्यात; गावात उत्साहाला उधाण!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी...

ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या निधनाने प्रकाशन विश्वाचा मार्गदर्शक दुवा निखळला!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  मराठी प्रकाशन विश्वात विश्वासार्ह अशी व्यावसायिकता आणि प्रयोगशीलता राबवून अनेक उद्योन्मुख साहित्यिकांची जगाला ओळख करून देणारे ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!