⬤ झुंजार सेनापती l नागपूर
विदर्भात दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी मोठी संधी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भातील दुग्धव्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू असून एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण विदर्भातील दूध उत्पादन कोल्हापूरच्या तुलनेत वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दुग्धव्यवसायासोबतच शेळीपालन आणि पशुसंवर्धन हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे पर्यायी स्रोत ठरू शकतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय सुविधा आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
रामटेक येथे शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक उपचारपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. दिवंगत दत्ता मेघे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय असून, रामटेकमध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न मेघे कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेले, असेही गडकरी यांनी सांगितले.
श्री दत्ता मेघे फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते


