झुंजार सेनापती l सांगली
धनगर समाजाच्या उन्नतीसाठी सर्व गट-तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन समाजातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे. त्यांच्या पुढाकाराने रविवार, २२ फेब्रुवारी रोजी वाळवा तालुक्यातील आष्टा येथे नेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक दुपारी १ वाजता आष्टा येथील शैक्षणिक संकुलात होणार असून, समाजातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकारांशी बोलताना डांगे यांनी सांगितले की, सध्या धनगर समाजातील नेतृत्व गटबाजीमुळे कमकुवत झाले असून, माझी अवस्था “म्हाताऱ्या सिंहासारखी” झाली आहे. नाहीतर मीच सरकार ला धारेवर धरले असते. असं ही अण्णासाहेब डांगे यांनी म्हटले आहे.
शासनाने समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, आता सर्वांनी एकत्र बसून ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
“समाजाला वाऱ्यावर सोडले गेले आहे. त्यामुळे वैयक्तिक मतभेद विसरून समाजहितासाठी एकजूट दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
२२ फेब्रुवारीच्या बैठकीत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरक्षणासह विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार असून, पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.



