spot_img
spot_img

उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा

– उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

झुंजार सेनापती l मुंबई
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, त्या पदवीचे रोजगारात रूपांतर होणे अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ याचा पहिला दीक्षांत सोहळा मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले की, या पहिल्या दीक्षांत सोहळ्यातील पदवीधर विद्यार्थ्यांनी इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. हे विद्यार्थी भारताला ‘जागतिक कौशल्य केंद्र’ बनविण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करणे गरजेचे असून कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, हरित ऊर्जा आणि डेटा विश्लेषण यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम केले पाहिजे.
जपानच्या प्रगतीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, नैसर्गिक साधनसंपत्ती कमी असूनही कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या जोरावर जपानने मोठी झेप घेतली. भारतीय तरुणांनीही हीच कामाप्रती निष्ठा अंगीकारणे आवश्यक आहे.
उद्योजकतेविषयी बोलताना त्यांनी रतन टाटा यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. नफा कमावत असतानाच सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा आदर्श टाटांनी घालून दिला आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाज, राज्य आणि देशाच्या प्रगतीशी निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनीही विद्यापीठांनी नाविन्यता आणि प्रयोगशीलतेला चालना देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एआय लिविंग लॅब’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्यांवर काम करण्याची संधी मिळणार असल्याचे नमूद केले.
समारोप करताना उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिक्षण घेण्याची वृत्ती ठेवण्याचा सल्ला दिला. कॅम्पसबाहेरचे स्पर्धात्मक जग कठीण असले तरी आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

मोशीतील हिंदू संमेलनामुळे वाहतुकीत बदल

झुंजार सेनापती l पिंपरी-चिंचवड मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात आज (रविवार) ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात...

महागाईची मोठी लाट येण्याचा गांधींचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २२ : इराण-इस्रायल युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. पुरवठा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!