spot_img
spot_img

महिला बचत गटांची ताकद देशाला नवी दिशा देणार

-- देवेंद्र फडणवीस

झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुंबई : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान निर्णायक असून, नारीशक्ती अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक बनली तरच भारत पूर्णपणे विकसित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बांद्रा-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने विविध योजना राबवल्या असून त्याचा मोठा लाभ महिलांना होत आहे. राज्यात ५० लाख लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा मानस असून, त्यासाठी नर्सरी उभारणीपासून झाडांची निगा राखण्यापर्यंत सर्व खर्च शासन उचलणार आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे महिला बचत गटांसाठी मोठी बाजारपेठ ठरत असून, येथे ग्रामीण ते उच्च शिक्षित महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यावसायिक स्वरूप मिळत आहे. या प्रदर्शनातून महिलांची स्पर्धात्मक क्षमता स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.
डिजिटल युगात ई-वाणिज्याचा वाढता प्रभाव लक्षात घेता ‘उमेद मार्ट’ या संकेतस्थळाद्वारे महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मंचावर एक हजाराहून अधिक वस्तूंची नोंद करण्यात आली असून नागरिकांनी याच माध्यमातून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महिलांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उभी करण्याच्या दृष्टीने २० जिल्ह्यांत उमेद मॉल सुरू करण्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांतही लवकरच विस्तार होणार आहे. पुढील काही वर्षांत हे जाळे तालुका स्तरापर्यंत नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
प्रास्ताविकात जयकुमार गोरे यांनी सांगितले की, राज्यातील ३९ हजारांहून अधिक गावांत ‘उमेद’ अभियान पोहोचले असून ६४ लाख कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ६८ हजार महिला बचत गट कार्यरत आहेत. महिलांच्या प्रामाणिक कर्जफेडीमुळे कर्जाची थकबाकी अत्यल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत महिला उद्योजकांशी संवाद साधला. तसेच उमेदच्या ६८ यशकथांवरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Related Articles

कुंभमेळ्याच्या नावाखाली बळीराजाचा बळी देण्याचा प्रयत्न सरकारला महागात पडेल!

झुंजार सेनापती l नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून नाशिक जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. दरी, मातोरी, मुंगसरे आणि मखमलाबाद परिसरातील जमिनी संपादनाच्या विरोधात...

पिंपरीत बालअपहरणाच्या तयारीत असलेली महिला पकडली

झुंजार सेनापती l पुणे  पिंपरी-चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरात आज दुपारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित महिलेला सतर्क...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!