spot_img
spot_img

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

आषाढी महापूजेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

झुंजार सेनापती l पंढरपूर
आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांच्या समवेत शासकीय महापूजा केली. यानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, विठ्ठल दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता अधिक प्रशस्त आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावर्षीच कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील आणि भाडेकरूंसाठीही योग्य व्यवस्था करण्यात येईल.
यंदाच्या आषाढी वारीत दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची रांग लागूनही वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत आनंदाने दर्शन घेतल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच वाळवंट परिसरात उत्कृष्ट सुविधा उभारल्याबद्दल प्रशासनाचेही त्यांनी कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने करण्यात आलेली ही महापूजा जगभरातील विठ्ठलभक्तांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
महापूजेनंतर मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने व प्रभावती माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना एसटी महामंडळाकडून वर्षभरासाठी मोफत प्रवास पासही प्रदान करण्यात आला.
याच कार्यक्रमात पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!