⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील गाई आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी व सहकारी दूध संघांनी घेतला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही सुमारे १० टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
या दरवाढीनंतर गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ७८ रुपये होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर आणखी आर्थिक भार पडणार आहे.
राज्यातील प्रमुख खासगी व सहकारी दूध संघांचा समावेश असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांनी वाढ झाल्याने दूध संकलन व वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. वाढलेला वाहतूक खर्च, प्रक्रिया खर्च आणि इतर वाढत्या खर्चाचा विचार करून दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या दरवाढीचा थेट परिणाम दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या ग्राहकांच्या खिशावर होणार असून, आगामी काळात दूध, दही, ताक, पनीर यांसह अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.



