⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील मंजूर आणि अधिकृत इमारतींमधील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख आणि मालकी हक्कांचा पूरक अभिलेख मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंबंधीची प्रारूप अधिसूचना २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त अभिप्रायांचा विचार करून दोन महिन्यांत अंतिम नियमावली तयार केली जाणार आहे.
सध्या ग्रामीण भागातील जमिनींसाठी सातबारा, तर नागरी भागातील जमिनींसाठी मिळकत पत्रिका उपलब्ध आहे. मात्र, इमारतीमधील स्वतंत्र सदनिकेला महसूल अभिलेखात स्वतंत्र ओळख मिळत नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा राज्यातील सुमारे सात कोटी नागरिकांच्या मालमत्ता हक्कांशी संबंध असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अधिकृत इमारतींनाच लाभ
सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा आणि नोंदणीकृत हक्कदस्त असलेल्या इमारतींमधील सदनिकांनाच हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. अनधिकृत बांधकामांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. प्रत्येक सदनिकेचा स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख तयार केला जाणार असून, त्यामध्ये सदनिका क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, स्वतंत्र ओळख क्रमांक, हक्क आणि संबंधित बोजे यांची नोंद असेल.
कर्ज, थकबाकी आणि बोजांचीही नोंद
सदनिकेवरील बँक कर्ज, मालमत्ता कराची थकबाकी, गृहनिर्माण संस्थेची देणी, न्यायालयीन निर्बंध आणि शासकीय देणी यांची माहितीही अभिलेखात नोंदवली जाणार आहे. सामायिक बोजे इमारतीच्या मुख्य अभिलेखात, तर वैयक्तिक कर्ज किंवा बोजे संबंधित सदनिकेच्या अभिलेखात नोंदवले जातील.
ऑनलाइन अर्ज अन् डिजिटल स्वाक्षरीचे कार्ड
जमीनधारक, विकासक, सदनिकाधारक किंवा गृहनिर्माण संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी अर्ज करू शकेल. संस्था सर्व सभासदांच्या वतीने सामूहिक अर्ज करू शकणार असून, वैयक्तिक अर्जाचीही सुविधा असेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. मंजुरीनंतर सदनिकाधारकाला डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महारेरा आणि भूमी अभिलेख विभागाच्या प्रणाली एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मालमत्तेच्या नोंदी अद्ययावत ठेवणे शक्य होणार आहे.
या प्रणालीमुळे सदनिकांच्या मालकी हक्कांची पडताळणी, खरेदी-विक्री आणि बँक कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होईल. मालमत्तेवरील बोजे आणि थकबाकीबाबत पारदर्शकता वाढून फसवणूक तसेच मालमत्ताविषयक वाद कमी होण्यास मदत होईल. ही सुविधा ऐच्छिक असून, सेवा शुल्काबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मसुद्यावर हरकती-सूचनांसाठी ३० दिवसांची मुदत
प्रारूप अधिसूचना महसूल विभागाच्या https://rfd.maharashtra.gov.in/ आणि भूमी अभिलेख विभागाच्या https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तहसील कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालये, भूमी अभिलेख कार्यालये, ग्रामपंचायती आणि गावांच्या चावडीवरही मसुदा प्रसिद्ध केला जाणार आहे.


