⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मत्स्य व्यवसाय विभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मच्छीमारांचे प्रश्न, विभागातील प्रशासकीय बाबी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदत पॅकेजच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत महाराष्ट्र सागरी व भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना, विभागाच्या आकृतीबंधाची अंमलबजावणी, मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील बदल्या आणि सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
तसेच, मत्स्य व्यावसायिकांना प्रलंबित असलेल्या डिझेल परताव्याच्या प्रश्नाचाही आढावा घेण्यात आला. या विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून सर्व प्रलंबित बाबी कालबद्ध पद्धतीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना, नुकसानग्रस्तांना मदतीचे वितरण आणि डिझेल परताव्याचा प्रश्न मार्गी लागल्यास राज्यातील सागरी तसेच भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता संबंधित विभागाकडून या निर्देशांची कितपत आणि किती वेगाने अंमलबजावणी होते, याकडे मच्छीमार व मत्स्य व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.



