⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान मिळविला आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘नवीकरणीय ऊर्जा राज्य मूल्यांकन आराखड्या’अंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राने गुजरातनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’च्या समारोप सत्रात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मूल्यांकनाचे निकाल जाहीर केले. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने केंद्रीय मंत्रालयाने हा राज्य मूल्यांकन आराखडा विकसित केला आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेतील वाढ, धोरणात्मक व नियामक व्यवस्था, वीज ग्रिडची सज्जता, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी तसेच गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण अशा विविध महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकनात महाराष्ट्राने मिळविलेला दुसरा क्रमांक राज्यातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे दर्शवितो. स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.


