⬤ झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आपलं मंत्रालय’ हे सशक्त व्यासपीठ ठरत आहे. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

दीपावलीनिमित्त मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित काव्यसंध्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेखनाचे आणि साहित्याचे स्वागत करत ‘आपलं मंत्रालय’ या मासिकाशी सर्वांनी आपलेपणाने जोडले जावे, असे आवाहन केले.
‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक मासिक नसून मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्वांनी या मासिकात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपल्या लेखनातून त्याला अधिक समृद्ध करावे, असेही ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते, तिच्या विचारांना नवी दिशा आणि दृष्टी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
मंत्रालयात दीपावलीनिमित्त काव्यसंध्येचे आयोजन; ‘वाघूर’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
या काव्यसंध्येत विविध कवींनी सामाजिक, सांस्कृतिक विषयांसह मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावभावनांवर आधारित कविता सादर केल्या. कवींच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला साहित्यिक रंगत आली. यावेळी नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ दिवाळी विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आणि मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


