⬤ झुंजार सेनापती l मुंबई
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर पोहोचत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. केवळ सणाचा आनंदच नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी प्राधान्याने हाती घेतला. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी कामगारांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी मंत्री गोरे यांनी कामगारांसोबत दिवाळीचा फराळ केला. कामगार कुटुंबांना फराळ व आहेर, लहान मुलांना नवीन कपडे देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महिलांना भाऊबीजेची भेट देण्यात आली.
ऊसतोड कामगारांची मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात. ऊसतोडीसाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


