⬤ झुंजार सेनापती l छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील निवासस्थानालाच मध्यरात्री लक्ष्य करण्यात आल्याने शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी त्यांच्या निवासस्थानी दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतले. आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांनी हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या निवासस्थानावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न होतो, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचत नाहीत, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
पोलीस आयुक्तांचा दूरध्वनी बंद होता, तसेच एकही पोलीस उपायुक्त (DCP) किंवा सहायक पोलीस आयुक्त (ACP) घटनास्थळी पोहोचला नाही, अशी तक्रार शिरसाट यांनी केली. “पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होतोय, त्याची तरी पोलिसांनी दखल घ्यावी,” अशा शब्दांत त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला सुनावले.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला. महासंचालकांनी फोनवरून या घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावरच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने शहरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तीन तरुणांनी मध्यरात्री केलेल्या या कृत्यामागील नेमके कारण काय, त्यांचा उद्देश काय होता आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.


