⬤ झुंजार सेनापती l पुणे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्रातील चालते-बोलते ज्ञानकोश होते. दूध संघ, साखर कारखाने, सहकारी बँका आणि कृषी पतसंस्थांच्या कामकाजाची त्यांना सखोल माहिती होती. त्यांची कार्यपद्धती नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. यानंतर नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


