⬤ झुंजार सेनापती l मुंबई
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. उपलब्ध पाणीस्रोतांचा प्रभावी वापर, पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण आणि पाणीचोरीला आळा घालण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढते तापमान आणि कमी पर्जन्यमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, उपलब्ध जलसाठ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आतापासूनच पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा-शेवा योजना टप्पा ३ ची उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्याशी संबंधित संरचनात्मक व पायाभूत सुविधांचा आढावा घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच पनवेल महानगरपालिका आणि परिसरातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


