spot_img
spot_img

एआय’कडे धोका नव्हे तर कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहा

– महासंचालक ब्रिजेश सिंह

झुंजार सेनापती l मुंबई
पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते. सत्याचा शोध घेणे आणि समाजाचा विश्वास टिकवणे ही जबाबदारी पत्रकारांचीच आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची मोठी संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’ चे उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी उपस्थित होते.
ब्रिजेश सिंह म्हणाले की, मानव इतिहासात छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. नंतर प्रसारमाध्यमांचा विस्तार झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता, तर डिजिटल माध्यमे आल्यानंतर दूरदर्शनला स्पर्धा निर्माण झाली. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज अनेक ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन मॅन वृत्तकक्ष’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, पडताळणी आणि मांडणीसारखी कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी क्षेत्रांतील अनेक बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो,” असे स्पष्ट सांगत त्यांनी पत्रकारांनी एआयचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. पत्रकारांसाठी लवकरच ‘पत्रकारितेत एआय’ या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे ज्ञाननिर्मिती, प्रसार आणि वापराची पद्धत झपाट्याने बदलत आहे. अनेक कामे स्वयंचलित होत असली तरी सत्य मांडण्याची जबाबदारी मानवी बुद्धीवरच राहणार आहे. पत्रकारितेचे मूलभूत बळ म्हणजे विश्वास असून सत्यता, विश्वासार्हता आणि संपादकीय जबाबदारी ही तत्त्वे कायम राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज एआयमुळे बातम्या वेगवान आणि अधिक गतिमान झाल्या आहेत. एका व्यक्तीकडून दिवसाला २० ते ३० लेख तयार होऊ शकतात. त्यामुळे माहितीचे प्रमाण वाढले असले तरी तिच्या विश्वासार्हतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एआयची एक मोठी मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ एआयला पूर्णपणे समजत नाही. बहुतेक मोठी भाषा प्रणाली पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्यामुळे भारतीय अनुभव, संस्कृती आणि भाषांचा डेटा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि डेटा सार्वभौमत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एआयमुळे ‘डिप फेक’ तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. खोटे व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले तरी खऱ्या व्हिडिओलाही खोटे ठरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित माहिती पडताळणी प्रणाली सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातही एआयचा वापर सुरू झाला असून बैठकींचे मुद्दे किंवा माहिती टाकल्यानंतर तत्काळ विविध भाषांमध्ये सामग्री तयार करता येते. त्यामुळे सरकारी माहिती आता अधिक वेगाने लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात पत्रकारितेत तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून आज एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, ध्वनीमुद्रण आणि संपादन अशी सर्व कामे करू शकतो, असे सांगितले. भविष्यात एआयमुळे आणखी मोठे बदल घडणार असल्याने पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेतील वक्त्यांचा सत्कार ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

A Dazardbet online fiók létrehozása és használata a legjobb játékélmény érdekében

Az online szerencsejáték világa folyamatosan fejlődik, és a felhasználók számára rendkívül fontos, hogy a legjobb játékélmény érdekében megfelelő fiókot hozzanak létre. A Dazardbet, mint...

How to Make the Most of BetMaze Casino’s Welcome Bonuses

Welcome bonuses can greatly enhance your gaming experience at online casinos like betmaze casino. In this article, we will explore effective strategies to maximize...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!