spot_img
spot_img

तामिळनाडूत ‘विजय पर्व’ सुरू; शपथ घेताच तीन मोठे निर्णय

झुंजार सेनापती l चेन्नई
सी. जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात केली. गेल्या साठ वर्षांनंतर बिगर द्रविडीयन पक्षाचा मुख्यमंत्री राज्याला मिळाल्याने या शपथविधीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
‘तमिळगा वेट्री कळघम’ पक्षाच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करणाऱ्या विजय यांनी शपथ घेताच जनतेसाठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. दरमहा २०० युनिट मोफत वीज, महिला सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल आणि अमली पदार्थांविरोधात विशेष कृती दल स्थापन करण्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयांमुळे राज्यातील प्रशासनाची दिशा स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काल विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी दहा वाजता पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि मान्यवर उपस्थित होते. विजय यांच्यासोबत एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के.जी. अरुणराज, के.ए. सेनगोडैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांच्यासह आणखी नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथ घेताना विजय यांनी ठरवून दिलेल्या मजकुरापलीकडे बोलण्यास सुरुवात केली असता राज्यपालांनी त्यांना मध्येच थांबवत अधिकृत लिखित शपथ वाचण्यास सांगितले. त्यानंतर विजय यांनी संमती दर्शवत शपथ पूर्ण केली.
शपथविधीनंतर केलेल्या छोटेखानी भाषणात विजय म्हणाले की, “माझा जन्म कोणत्याही राजघराण्यात झालेला नाही. जनतेनेच मला स्वीकारले आणि आपलेसे केले. त्यामुळे खोट्या आश्वासनांनी जनतेची फसवणूक कधीही करणार नाही.”
मागील द्रमुक सरकारवर टीका करत त्यांनी राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज लादल्याचा आरोप केला. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची घोषणाही त्यांनी केली.
अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि जनतेचा एकही पैसा हडप होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. “आमच्या कामातूनच आमची क्षमता सिद्ध करू. आम्हाला थोडा वेळ द्या. प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायावर आधारित नव्या प्रशासनाची सुरुवात आज होत आहे,” असे विजय यांनी सांगितले.
सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचेही त्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी समाजमाध्यमांवर संदेश देत विजय यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री होताच विजय यांनी तत्काळ सचिवालयात जाऊन महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. राज्यातील प्रत्येक घराला २०० युनिटपर्यंत मोफत वीज, अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणासाठी विशेष कृती दल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष सुरक्षा पथक स्थापन करण्याच्या आदेशांवर त्यांनी स्वाक्षरी केली.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!