⬤ झुंजार सेनापती l मुंबई
जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनामार्फत व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठीही नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घाटकोपर येथील आराध्य भक्ती पार्क येथे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने आयोजित कर्जवितरण समारंभात ते बोलत होते.
पहिल्या टप्प्यात ५१ कोटींचे कर्ज 
महामंडळाच्या तीन योजनांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५११ लाभार्थ्यांना एकूण ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. यामध्ये शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना आणि महिला बचत गट कर्ज योजनेचा समावेश आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जैन समाजाचे आवाहन
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. प्रत्येक व्यक्तीने किमान १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम करण्यासोबतच शिष्यवृत्ती, विधवा महिलांना व्यवसायासाठी अनुदान, पाठशाळांचे आधुनिकीकरण आणि विहारधाम उभारणीसाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



