spot_img

एसआरएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाही सरसावणार; एकनाथ शिंदेंचे निर्देश

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) रखडलेले काही प्रकल्प शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने हाती घेऊन ते प्राधान्याने पूर्ण करावेत. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करून कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची ४५ वी बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती, थकीत भाडे वसुली आणि समूह पुनर्विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सप्टेंबर २०२६ अखेरच्या आढाव्यानुसार खासगी विकासकांकडे वितरित करण्यात आलेल्या ६६७ संक्रमण सदनिकांच्या भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. ही थकीत रक्कम प्राधान्याने वसूल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सवलतींचा विचार करून निश्चित करण्यात आलेल्या थकीत भाड्याच्या वसुलीसाठी प्रभावी पाठपुरावा करावा. वसुली प्रक्रियेला गती देऊन निर्धारित कालमर्यादेत संपूर्ण थकबाकी वसूल करण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांना गती देण्याबाबत बैठकीत विशेष चर्चा झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सहा समूहांचा पुनर्विकास प्रस्तावित असून, उल्हासनगरमध्येही २९ पेक्षा अधिक समूहांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे.
या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण, नियोजन तसेच सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

Related Articles

३०४ दुष्काळी तालुक्यांना दिलासा; तलावांचे गाळपेरा क्षेत्र चारा लागवडीसाठी खुले!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने दुष्काळी घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलाशय आणि तलावांमधील लागवडीयोग्य...

महादेव मंदिरासाठी उपसरपंचांचे दातृत्व; स्वखर्चातून पेव्हर ब्लॉकचे काम सुरू!

⬤ झुंजार सेनापती l बीड  नेकनूर येथील महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत, अशी गावातील हिंदू समाज बांधवांची मागणी होती. या मागणीची दखल घेत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!