spot_img
24.7 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना संरक्षण मंत्र्यांचे निमंत्रण

झुंजार सेनापती l छत्रपती संभाजीनगर 

उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केला.

मराठवाडा:आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी’, याविषयावर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित चर्चासत्रात श्री.फडणवीस बोलत होते.

संरक्षण सामग्रीसाठी लागणाऱ्या उत्पादनांची आयात कमी करून देश आत्मनिर्भर होत आहे. सद्यस्थितीत ५०० हून अधिक उत्पादने देशातच बनविले जात आहेत. संरक्षण सामुग्री निर्मिती क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या धाडसी उद्योजकांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्योजकांच्या शिष्टमंडळाने दिल्लीला पुढील चर्चेसाठी यावे, असे आवाहन करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथील उद्योजकांना निमंत्रण दिले.

येथील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित या चर्चासत्रास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राजस्थान चे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  पणन मंत्री जयकुमार रावल, इतर मागास वर्ग कल्याण व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड,आ. नारायण कुचे,आ. अनुराधा चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करून चर्चासत्राचा प्रारंभ करण्यात आला.

डिफेन्स क्लस्टर विकसित करावे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे उद्योग मॅग्नेट आता छत्रपती संभाजीनगर होत आहे.औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेले १० हजार एकर क्षेत्र उद्योगांना वितरित झाले असून उद्योजकांकडून अजून मागणी होत आहे. त्यामुळे आणखी ८ हजार क्षेत्र उद्योगासाठी देण्याचे नियोजन आहे.येथे उत्तम उद्योग परिसंस्था आहे.मनुष्यबळ, दळणवळण, ऊर्जा अशी सर्व उपलब्धता आहे. त्यामुळे उद्योजक छत्रपती संभाजीनगरची निवड करतात. येथे आलेले उद्योजक येथलेच होऊन जातात

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ईलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगात छत्रपती संभाजीनगर अग्रणी आहे. येथील धाडसी व काही करू पाहणाऱ्या या उद्योजकांचा संरक्षण सामुग्री निर्मिती उद्योगात पुढे येण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकारात्मकता दर्शवावी. त्यांना प्रोत्साहन द्यावे. येथे देशातील ऑटो क्लस्टर विकसित झाले त्याचप्रमाणे डिफेन्स क्लस्टर तयार करावे. संरक्षणसामुग्री उत्पादन उद्योगात अमर्याद संधी आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांत पूर्ण क्षमता आहेत. त्याला चालना देण्यासाठी येथे डिफेन्स क्लस्टर विकसित करण्यासाठी चालना मिळावी, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.

उद्योजकांच्या धाडस व तळमळीचे कौतुक-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, येथील उद्योजकांच्या धाडसाचे कौतुक करायला हवे. संरक्षण उत्पादनांच्या उद्योगात भारत आत्मनिर्भर व्हावा, ही आपल्यातील तळमळ कौतुकास्पद आहे.आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध,वचनबद्ध आहोत. आणि त्यात देशाला यश मिळत आहे. देशात उत्पादीत संरक्षण सामुग्री आता आपण निर्यात करू लागलो असून ही निर्यात आपण ६०० कोटी वरून २४०० कोटी पर्यंत वाढवली. संरक्षण क्षेत्रात लागणारी ५०० हुन अधिक उत्पादने देशातच बनवण्याचे आमचे धोरण आहे.आयात कमी करून ३ लाख कोटी पर्यंत संरक्षण उत्पादने वाढविण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले की, येथील उद्योग परिसंस्था उत्तम असल्याचे दिसून येत आहे. आपल्या क्षमतांच्या सादरीकरणासाठी दिल्लीला यावे. असे त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात प्रारंभी अध्यक्ष अर्पित सावे यांनी सादरीकरण करून डिफेन्स क्लस्टर साठी छत्रपती संभाजीनगर उत्तम व पोषक असल्याची भूमिका मांडली.

सादरीकरणातील महत्त्वाचे मुद्दे

छत्रपती संभाजीनगर हा औद्योगिकदृष्ट्या अग्रगण्य जिल्हा असून येथे ५ हजारांहून अधिक उद्योग आहेत. निर्यातीत २७ वा क्रमांक असून जीएसटी कर संकलनात राज्यात ४ था क्रमांक आहे. ३ लाख हून अधिक कामगार कर्मचाऱ्यांचे संरक्षण विमा योजनेत नोंदणी आहे. राज्याच्या एकूण उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन येथे होते.१० हजार एकर जागेवर स्थापित औद्योगिक वसाहत असून सर्व जागा उद्योगाना वाटप झाली आहे. येथे संरक्षण उत्पादने उद्योग परिसंस्था विकसित करण्यास वाव आहे. हा जिल्हा समृद्धी महामार्ग, रेल्वे, विमान वाहतूक सेवेने जोडलेला आहे. जालना ड्राय पोर्ट सुविधा जवळ आहे. येथे सप्ततारांकीत उद्योग सुविधा असून , वॉक टू वर्क कल्चर विकसित झाले आहे.

यांत्रिकी, पेट्रोलियम, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या उद्योगांच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी व विकासासाठी अग्रगण्य प्रशिक्षण संस्था कार्यरत व सध्या अस्तित्वात आहेत.

मराठवाडा ऑटो क्लस्टर, देवगिरी इले. क्लस्टर, मॅजिक स्टार्टअप इनक्युबेटरसारख्या उद्योगनिहाय पायाभूत सुविधा एकत्रितरित्या उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी सिस्टीम, मिसाईल वहन व रडार तंत्र प्रणाली, मोटार वाहन व सैन्यदलाच्या आवश्यकतेनुसार वाहने निर्मिती (रणगाडे वगैरे) क्षमता आहे.

आत्मनिर्भर भारत संकल्पनेत योगदान देण्यास येथील उद्योजक उत्सूक आहेत.

हवाई तंत्र व संरक्षण उद्योगात योगदान देण्यास सज्ज.

याआधीच संरक्षण उद्योग कार्यान्वित असलेल्या नाशिक, अहिल्यादेवी नगर, पुणे आणि नागपूर या सर्व शहरांपासून समान अंतरावर आहे.

 

Related Articles

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी बृहत आराखडा सादर करा

झुंजार सेनापती l मुंबई पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण...

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटी

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!