spot_img
34.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड,आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. 

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे. या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा. असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणाऱ्या भाविकांना शिर्डी विमानतळ सोईचे होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये 8 वाहनतळे, दोन हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्यावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे.

लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे. त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या विमानतळाचा विकास करण्यात यावा. या विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यांनाही लाभ होईल. तसेच कराड येथील विमानतळाचे काम वेगाने सुरू करून तेथे नाईट लँडिगची सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

चंद्रपूर येथील विमानतळावर चार्टर्ड विमाने उतरू शकतील अशी सुविधा तयार करण्यासाठी तेथील धावपट्टी वाढविण्यात यावी. गडचिरोली येथील विमानतळासाठी दोन ते तीन पर्यायी जागांचा विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे येथील विमानतळाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. प्रादेशिक जोडणी योजना (रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम) अंतर्गत सध्या राज्यात 16 मार्गांवर विमानसेवा सुरू असून उड्डाण योजनेअंतर्गत राज्यातील आठ प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, संचालक मंडळतील सदस्य तथा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी,  ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!