झुंजार सेनापती l नवी दिल्ली
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव , अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान
राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षण, शिस्त, आणि कार्यक्षम नेतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती