झुंजार सेनापती l मुंबई
“स्वराज्य जनजागृती परिषद” या नवीन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आता कानाकोपऱ्यात लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकशिक्षण आणि लोकजागृती हा संघटनेचा मूळ गाभा असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी संस्था काम करेल. व्यक्तीला नव्हे तर व्यवस्थेला विरोध हे गेल्या तीस वर्षापासूनचे धोरण कायम असणार आहे, असे स्वराज्य जनजागृती परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ही चळवळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील सर्व शाखा बरखास्त करण्यात आल्या. मात्र आजही विश्वस्त म्हणून ॲड. अजित देशमुख व इतर या जन आंदोलनात अण्णांसह आहेत.
गेल्या वीस – पंचवीस वर्षांपासून जन आंदोलनाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत. या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून हे संघटन स्थापन करण्यात आले आहे. नवीन संघटन स्थापन झाल्यानंतर त्या संघटनेला कार्यकर्त्याची वानवा असते. मात्र स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन होण्यापूर्वीपासूनच हजारो कार्यकर्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे परिषदेचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहे.
स्वराज्य जन आंदोलन परिषदेचे अध्यक्ष म्हणून ॲड. अजित एम, देशमुख (बीड), उपाध्यक्ष म्हणून संदीप विठ्ठल जगताप (सातारा), सचिव तुषार अच्युतराव पाटील (कुर्ला), सहसचिव अरुण मोहन बोबडे (धाराशिव), कोषाध्यक्ष शिवाजी बबन खेडकर (पुणे), तर सदस्य म्हणून विष्णू भगवान ढवळे (छत्रपती संभाजीनगर) आणि गोवर्धन विठ्ठलराव मस्के (बीड) हे या संघटनेत विश्वस्त म्हणून कामकाज पाहणार आहेत.
संघटनेची पायाभरणी करताना अनेक विभागातून विश्वस्त घेण्यात आले आहेत. हे सर्व विश्वस्त त्या त्या भागात प्रभावशाली रीतीने काम करत आहेत. त्यामुळे संघटनेची बांधणी प्रभावशाली रीतीने होईल. कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी लवकरच विश्वस्त मंडळाची एक बैठक घेतली जाणार आहे.
यानंतर कार्यकर्त्यांचे जिल्हास्तरीय मेळावे, बैठका आणि राज्यस्तरीय मेळावा याबाबत सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. चारित्र्य संपन्न, भ्रष्टाचाराचा कसलाही डाग नसलेला, स्वार्थ बाजूला ठेवून आदर्शाची कास धरून चालणारा आणि समाज हितासाठी वाहून घेणारा प्रामाणिक कार्यकर्ता जोडणे, हा आमचा उद्देश आहे.
लोकशिक्षण आणि लोकजागृती ही सध्या आवश्यक आहे. समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे लोकशिक्षण आणि लोक जागृती हा प्रमुख गाभा मानण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि समाजाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या, समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करून समाज हिताचे काम करण्याची मनोमन इच्छा असणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन असे कार्यकर्ते देखील नव्या संघटनेशी जोडण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. ॲड. अजित देशमुख आणि पदाधिकाऱ्यांवर या निमित्ताने शुभेच्छांच्या वर्षा होत आहे.