झुंजार सेनापती l मुंबई
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक शाळा धोकादायक व मोडकळीस आलेल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ९४ शाळांना इमारतीच नाहीत, तर ३८१ शाळांमधील ६०७ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे. पावसाळ्यात गेल्या महिनाभरात छप्पर कोसळून विद्यार्थी जखमी होण्याच्या तसेच शाळांच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून ज्ञानार्जन सुरू आहे.
या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून शिक्षण विभागाने २ वर्षांपासून १४ कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता मात्र निधी मिळत नव्हता.मात्र गेल्या ९ महिन्यांपासून वारंवार निवेदनं व आंदोलनं करूनही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या गाडीसमोर उडी मारून ताफा अडवण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला होता.
आंदोलनाच्या केवळ एक दिवस आधीच प्रशासनाने शाळांसाठीचा मोठा निधी मंजूर केल्याचे लेखी पत्र भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बीड यांनी डॉ. ढवळे यांना दिले. यात शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये आणि नवीन इमारतींच्या बांधकामासाठी १६ कोटी ५० लाख रुपये, असे एकूण २१ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून विद्यार्थ्यांची काही प्रमाणात तरी गैरसोय दूर होणार आहे.
शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी
शिक्षणाधिकारी फुलारी यांनी पत्रकाद्वारे कळवले की, जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण सन २०२५-२६ अंतर्गत शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्राधान्याने अत्यावश्यक दुरुस्ती असलेल्या शाळांची कामे मंजूर करून दोन ते तीन दिवसांत प्रशासकीय मंजुरी दिली जाणार असून तातडीने कामे सुरू केली जातील. तसेच अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
१४२ शाळांमध्ये १७२ वर्गखोल्या नव्याने उभारल्या जाणार
शाळांच्या नवीन बांधकामासाठी १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याअंतर्गत खालीलप्रमाणे कामे हाती घेतली जाणार आहेत :
३१ इमारतविरहित शाळांमध्ये ३७ वर्गखोल्या – ₹३६३.०० लक्ष
८६ शाळांमध्ये धोकादायक वर्गखोल्यांच्या जागी १०७ नवीन खोल्या – ₹१०४९.०० लक्ष
२५ शाळांमध्ये अतिरिक्त २८ वर्गखोल्या – ₹२७७.०० लक्ष
अशा प्रकारे १४२ शाळांमध्ये १७२ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ₹१६८९.०० लक्षाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया करून ही कामे तातडीने सुरू केली जाणार आहेत.
संघर्षाला यश – प्रसारमाध्यमांचे आभार
या संवेदनशील विषयाला गांभीर्य देण्यासाठी डॉ. गणेश ढवळे यांनी गेल्या ९ महिन्यांत वारंवार निवेदनं, आंदोलनं केली. त्याला प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिल्यामुळे शासन दरबारी हा मुद्दा पोहोचला. या निधीमंजुरीच्या यशासाठी डॉ. ढवळे यांनी पालकमंत्री अजित पवार, प्रशासन व प्रसारमाध्यमांचे आभार मानले.