झुंजार सेनापती l मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर, शनिवार 4 ऑक्टोबर रोजी 5 हजार 187 अनुकंपा तत्त्वावर उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5 हजार 122 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल होतील.राज्य रोजगार मेळावा हा ऐतिहासिक सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शनिवार सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा (विदर्भ व तापी व कोकण खोरे विकास महा.), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही.राधा, कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार सुर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत.शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय कारणाने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5,187 अनुकंपा उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपांचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक श्रेणीतील 5,122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3,078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2,597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1,674, नाशिक विभागात 1,250, तर मराठवाड्यातील 1,710 उमेदवार आहेत.
विकसित महाराष्ट्र-2047 ध्येयाकडे वाटचाल
राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र-2047 या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत. शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती तसेच लिपिकांच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया मिशन मोडमध्ये हाती घेण्यात आली. महाराष्ट्रात व्यापक भरती मोहीम राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती केली जात आहे. या “महा-भरती”चे वैशिष्ट्य असे आहे की ती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासन पद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे.