झुंजार सेनापती l मुंबई
राज्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी महिन्यापासून देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
राज्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री मकरंद पाटील बोलत होते. सदस्य सर्वश्री निलेश राणे, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली.
राज्यात विशेषतः कोकणात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत अद्याप सुरू नसून ती डिसेंबरनंतर वितरित केली जाईल, असे मंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी सांगितले.
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील म्हणाले, राज्यात सलग सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केंद्रीय मदतीशिवाय अतिरिक्त मदत देत आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणाऱ्या नियमित मदतीबरोबरच रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
पावसामुळे जमीन खरडून वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 47,000 रूपये नियमित मदत दिली असून, याशिवाय मनरेगा अंतर्गत प्रति हेक्टर 3 लाख रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णयही घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
ई-केवायसीमुळे मदत वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाने ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी मदतीसाठी स्वीकारला असून ७५ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी यंदा सुमारे 20,000 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी 14,000 कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे (डीबीटी) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. खरीप हंगामात ९० लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी, तर रब्बी हंगामात 85.78 लाख शेतकऱ्यांना 6,864 कोटी रुपये वितरित करण्यात आले, अशी माहिती मंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी दिली.



