झुंजार सेनापती l पुणे
पुण्यातील वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या बाहेर रॅगिंगच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी कॉलेजच्या बाहेर असताना काही तरुणांनी त्याला अडवून वाद घातला. हा वाद वाढत जाऊन चौघांनी एकत्रितपणे लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेमुळे कॉलेज परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॅगिंग आणि बाहेरील गुंडगिरी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.



