झुंजार सेनापती l नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवेचा ऐतिहासिक प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंडिगो या विमान कंपनीचे पहिले विमान बेंगळुरू येथून सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावर यशस्वीपणे दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच हैदराबादसाठी पहिले प्रस्थान नोंदवण्यात आले.
पहिल्या आगमन व प्रस्थान उड्डाणांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी सहभागी झाले होते. बहुतांश प्रवासी नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने उत्साहाचे वातावरण दिसून आले. प्रवाशांनी विमानतळावरील प्रशस्त टर्मिनल, सुव्यवस्थित सुरक्षा तपासणी, वेगवान चेक-इन प्रक्रिया आणि आधुनिक सुविधा यांचे स्वागत केले.
पहिल्या दिवशी सुरू झालेल्या उड्डाणांमध्ये बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, गोवा आदी प्रमुख शहरांचा समावेश आहे. नवी मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतूक अधिक संतुलित होणार आहे.
विमानतळ प्रशासनाने पहिल्या दिवशी सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे सांगत, प्रवाशांच्या सोयीसाठी कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती दिली. येत्या काळात उड्डाणांची संख्या वाढवण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.



