spot_img
spot_img

दिव्यांगांच्या विशेष शाळांची दिव्यांग कल्याण विभागाकडून होणार तपासणी

सचिव तुकाराम मुंढे

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमाप्रमाणे देय आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी सुधारित व एकसमान तपासणी सूची निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
सचिव मुंढे म्हणाले की, थकीत वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अनेकदा आवश्यक कागदपत्रांची कमतरता, अपूर्ण आकडेवारी तसेच थकबाकीची कारणे स्पष्टपणे नमूद न केल्याचे आढळून येत होते. तसेच सर्व शाळा, कार्यशाळा व बालगृहांकडून प्रस्ताव सादर करताना एकसमान पद्धतीचा अभाव दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर सुधारित तपासणी सूची लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थांचे वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव तपासणी सूचीप्रमाणे तपासून आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडे सादर करावेत. त्यानंतर आयुक्तांनी या प्रस्तावांची सखोल पडताळणी करून तपासणी सूचीसह व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार राज्यात दिव्यांग कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अशासकीय अनुदानित मतिमंद, अंध, अस्थिव्यंग व मूकबधीर प्रवर्गातील एकूण ९३२ शाळा, कार्यशाळा व बालगृहे कार्यरत आहेत. या संस्थांना वेतन अनुदानासह परिपोषण, इमारत भाडे व कार्यालयीन खर्चासाठी वेतनेतर अनुदान दिले जाते, असेही सचिव मुंढे यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भातील शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!