spot_img
spot_img
spot_img

आरोग्य विभागातील बदल्या–पदोन्नती आता कामगिरीवर

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

झुंजार सेनापती l मुंबई

सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती आता कामगिरीवर आधारित करण्यात येणार असून, त्यासाठी ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) यांच्या मूल्यांकन (रँकिंग) अहवालानुसार पारदर्शक कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एनएचएसआरसी), नवी दिल्ली या संस्थेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’, पुणे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत राज्यातील आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन तसेच तांत्रिक सहकार्य पुरवले जाते. एसएचआरसीकडून राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका क्षेत्रांतील आरोग्य संस्था तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यांकन केले जाते.
या मूल्यांकनात प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असून, कामगिरीच्या आधारे दरमहा रँकिंग निश्चित केली जाते. यापुढे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली व बढती या रँकिंग अहवालाच्या आधारेच करण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे आरोग्य सेवांचे कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीबरोबरच ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सीएसआर देणाऱ्या संस्थांना योग्य प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डीपीएम), जिल्हा लेखा व्यवस्थापक (डीएएम), एनएचएम सल्लागार व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावेत, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
या बैठकीत पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण तसेच अधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या आरोग्य संस्थांबाबत सादरीकरण करण्यात आले. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

शाई पुसून पुन्हा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी...

महापालिकेच्या महासंग्रामात ११५३ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

झुंजार सेनापती  l पुणे  पुणे शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, याचा कौल आज मतदार देणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!