झुंजार सेनापती l बीड
नेकनूरच्या आठवडी बाजारात तब्बल २० लाख रुपयांची चोरी झाली चोरी होत असताना नेकनुर पोलीस प्रशासन नेमके काय करत होते, याचा तपास पोलीस अधिक्षक साहेबांनी करावा असा संतप्त सवाल नागरिक व व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सोन्याचे व्यापारी बबन कानडे यांची १५ किलो चांदीची पेटी व ५० हजार रुपये रोख सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडली आहे.
दर रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होणारा नेकनूरचा आठवडी बाजार गेल्या काही दिवसांपासून खिसेकापू, मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरांचा अड्डा बनत चालल्याचे वास्तव असतानाही पोलिसांकडून कोणताही ठोस प्रतिबंधात्मक बंदोबस्त दिसून येत नाही. महिलांच्या गळ्यातील सोने चोरी, शेतकऱ्यांचे खिसे रिकामे होण्याच्या घटना नियमित घडत असताना पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी बाजारात हजारो नागरिक, व्यापारी, पशुधन विक्रेते उपस्थित असताना पोलीस गस्त, साधा बंदोबस्तही का नव्हता? सीसीटीव्ही, साधे निरीक्षण पथकही कार्यरत नसल्याने चोरट्यांनी मोकळेपणाने चोरी करून पोबारा केला.
या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, “बाजार चोरांसाठी की नागरिकांसाठी?” असा सवाल केला जात आहे. तात्काळ आरोपींचा शोध, पोलीस बंदोबस्त वाढवणे आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



