झुंजार सेनापती l बीड
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल १२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या आरटीओ कार्यालयाला स्वतःची हक्काची इमारत नव्हती. शहरातील विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यालय चालवले जात होते. त्यामुळे नागरिक, वाहनधारक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता.
ही बाब लक्षात घेऊन बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरटीओ कार्यालयासाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि आधुनिक इमारत उभारण्याची मागणी शासनदरबारी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाने या कामासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी दिली आहे.
या निधीतून बीड आरटीओसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त, सुसज्ज इमारत उभारली जाणार असून नागरिकांना एकाच ठिकाणी दर्जेदार सेवा मिळणार आहेत.
या कामास मंजुरी दिल्याबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.



